Monday, December 29, 2008

हीच माझी सांगता रे !

जात आहे मी अता रे
माग माझा काढता रे ?

पाउले टाकीत जातो
मार्ग माझा एकटा रे

रात्र नाही दीवसा रे
मी पहातो दीव्य तारे

घेउ द्या श्रमीत झालो
हीच माझी सांगता रे !

दिव्य दृष्टी लाभता ही
आसवांना ढाळता रे ?

एक गेला काय झाले
संपले का खुंटता रे ?

सुरेश पेठे
२९ डिसेंबर २००८

मी तुला जे सांगतॊ ते
काय त्याती कूटता रे ?

घ्या मजा या काव्यपक्ती
कां न त्याना लूटता रे ?

सुरेश पेठे
३० डिसेंबर २००८

Saturday, December 27, 2008

सामावयाची

      ( १ )

देवा तुझे रे अनंत उपकार
दिलास तू देहा सगुण आकार

दिलेस मजला तू सगे सोयरे
पाश अडकवुनि घेतले सारे

ज्यांच्या ज्यांच्या सवे झिजवली काया
उगाच वाटते जवळी असाया

ही पण माया ! मज तूच लावली
सुखात जावे हे दिवस म्हणुनी

जीव लावुनी घेतलेले होते रे
गळी लावले पाशांचे हारतुरे

पण तू आहेस आपमतलबी !
कावे असले येतात मज ध्यानी

काय साधसी अडकवुनि पाशा
कळले कावे सारे मज आताशा !

तट तट तुटतांना होती क्लेश
इच्छा जाण्याची, न राहो लवलेश

तजवीज तुझी आली माझ्या ध्यानी
इशारे लगेच उमगले मनी

तुझी संगत मज बहुमोलाची
आंस एक तुझ्यात सामावयाची

मी तर आहे रे तय्यार केव्हाचा
सांग पुढील मुक्काम करायचा ?

सुरेश पेठे
२८ डिसेंबर २००८

      ( २ )

मी निघालो मजला सामवायला
आलो इथे राम राम करायला

धन्य मज केले आपण जरी ही
निघावयास हवे आता तरी ही !

नसे राग लोभ, न काही जिव्हाळा
नुरे काही द्याया नुरला हवाला

नको पाश इथले जवळी आता
मार्गस्थ राहू द्या एकटा एकटा

केलेत बहुत प्रेम मजवरी
कसा होईन त्यासाठी उतराई

निघालो आता मजला सामवाया
आलो अखेरचा राम राम द्याया !

सुरेश पेठे
२८ डिसेंबर २००८

      ( ३ )

कविता कविताच असते
अर्थ नसतो त्यात दुसरा

का उगाच लावित बसता
का उगा कवीं वर घसरा ?

त्याच्या मनीचे ते सांगणे
मी मांडला फक्त पसारा!

आंस मनीची तीव्र दिसली
मागताहे म्हणून तो आसरा !

आपुल्या मनीच्या अर्थांना
चिकटवू नका, ते विसरा

सुरेश पेठे
२९ डिसेंबर २००८

      ( ४ )

विसरलात जे नको ते
मज धन्य धन्य केले
उपकार फेडणे अशक्य
न जन्मी या ते होणे !

आता मला तुम्ही हॊ
निरोप द्या अखेरचा
वाट ही नव्हेच माझी
चुकलाच, मार्ग भलता !

संपला रे इथला सर्ग
सापडला मज नवमार्ग
का घालवू काल व्यर्थ
पाहू द्या मज तो स्वर्ग !

जन्म इथला घालवलेला
स्मरणात नित्य ठेवीन
आठवांची सर्व पुष्पे
नित्य नित्य वाहीन !

सुरेश पेठे
३० डिसेंबर २००८

Saturday, December 20, 2008

वाट पाहताना

मी इकडे, तुझी वाट पाहताना
काय झाले तुज, वाट सापडेना ?

आठवते आभाळातून पडताना
गरजत चमकत येताना

आठवते खळाळत वाहताना
सागरी नि:शब्द तळमळताना

दिसतेस एकेक तारे मोजताना
हेलावते मन ज्योत तेवताना

अस्तीत्व तुझे अनवट ऐकताना
भिनतो श्वास गंध हुंगताना

दिवस रात चक्र फिरताना
विरहाची ज्चाला सोसताना

क्षण एक जाईना आठवताना
मी इकडे गं तुझी वाट पाहताना

सुरेश पेठे
२० डिसेंबर २००८

Wednesday, December 17, 2008

उत्तर

प्रश्न तेथे उत्तर कायम
ह्ट्ट हवाच कशाला पण?
उगा कशाला उत्तर मांगा
मागितले की रांगाच रांगा !

नशीब नशीब हेच काय
दु:ख सोसाची संवय हाय !
पराभवाचा बसला फटका
हवी कशा त्यातून सुटका ?

जीवनाचं हे रहाटगाडगं
कोणी बुडतं कोणी तरतं
हंसतं कोणी , कोणी रडतं
स्वार होऊन,मजेत राहतं !

सारीच सुखे घेऊन उरी
दु:ख ठेवायचे पर दारी ?
सुख दु:खे असे समाने
ठेवीले अनंते समाधाने !!


सुरेश पेठे
१६ डिसेंबर २००८

Thursday, December 11, 2008

शाश्वत

शाश्वत प्रेमात हेचि एक सत्य जाण
त्रुटी नामक नसे, जगी काही प्रमाण !

अवगुंठुन येतो तोचि असे स्वभाव
वाचता येतील असे मनीचे भाव ?

व्यक्ती फुलुन येते अंतर मनात
आमचे प्रेम ठरते, लपले जे आत !

प्रेम बसते जे त्या अंतर मनावर
व्यक्ति व्यक्ति जरी होतात अनावर !

बसले ते बसले की बाकि सर्व गौण
दिसु लागति मग अवगुण तेच गुण !

समजून असा आहे अजून एक त्यात
ओळखा ते शाश्वत जगी सर्व म्हणतात !

होईल जेव्हा आपलेसे ती होय निष्ठा
करा त्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा

जगी दुजॆ आहे शाश्वत सांगा ?
काय भुललासी वरलिया अंगा !

सुरेश पेठे
१३ डिसेंबर २००८

चरणी शरण दुजे काही नाही !

धीर आता मुळी धरवत नाही
अधीर मन हे आवरत नाही
मी कसे सावरू? सावरत नाही
लक्ष लक्षापाशी ठहरत नाही ....१

मनीचा पतंग लहरत नाही
मन तुजला रे विसरत नाही
आशेचा किरण झिरपत नाही
मनी चा विचार सरकत नाही ....२

मनाची कवडे उघडत नाही
मनाचे पांखरू विहरत नाही
मनातून सारे माझ्या जात नाही
मनाचा कोंडमारा संपत नाही ....३

जीवाची तडफड थांबत नाही
कुठली मिजास मिरवत नाही
तुझा पाठलाग करवत नाही
दर्शनाची आंस सोडवत नाही ....४

खोलीचा ठाव तुझ्या, लागत नाही
तरी हाती माझ्या गवसत नाही
ऋणानुबंध हे मोडवत नाही
चरणी शरण, दुजे काही नाही ! ....५

सुरेश पेठे
११ डिसेंबर २००८

Wednesday, December 3, 2008

भेट नाही जीवा शिवा

मूर्तीमंत भिती उभी, मज समोर ठाकली
तूं तुझ्या अन माझ्यात, कां अशी रेघ आखली

संपले अद्वैत अपुले, कां उगाच वाटले
अनंत योजने दूर, मजसी इथे लोटले

वाढता वाढत आहे, ही आपल्यातली दरी
हीच एक भिती मज, काळीज जाळे अंतरी

होय भास नित्यनवा, जवळी माझ्या तूं उभा
भासच तो छळतो गं, दिपवीत दिव्य प्रभा

काय एकेकाची तर्‍हा, आनंद होय का तुवा ?
जीव जाय विरहाने, भेट नाही जीवा शिवा !


सुरेश पेठे
०३ डिसेंबर २००८

अस्वस्थता

सुचतच नाही काही
बधीरता अंगी आली
नकळे कळून सारे
जाणीव मरून गेली

आकलनाच्या पल्याड
उघडेच ना कवाड
निसटून गेले सारे
अवचित हे घडले

कोणास काय विचारू ?
घरटी कुठे पांखरू
काय पाहू काय सांगू
आघात कसा विसरू

मन नाही थार्‍यावर
काय काय गवसले
होते ते ते हरवले
ठावुक मजसी नाही

मनाची अशी अवस्था
इथे सारी अस्वस्थता
ही तर त्याची व्यवस्था
हाच इथला शिरस्ता


मेघांनी नभ भरले
चमकत भिवविले
स्वच्छ अगदि दिसेना
मळभ दूर सरेना !!

सुरेश पेठे
०२ डिसेंबर २००८

गुंतवणुक !

गुंतले हृदय माझे तुझियात

तूं गुंत ना , पूर्ण होईल जीवन

मी वाहते, ओढ रे तुझिया कडे

भरतीची लाटेत खळाळत ये १



मनाची चौकट पूर्ण रे भरली

असण्याने तुझिया भारावले मी

तूं सांडलेले क्षणा क्षणांचे कण

वेचिंत फिरते गुंफित घेऊन २



अस्पष्ट स्पर्शाची होताच चाहूल

भांबावले आठवाने क्षणभर

श्वासात राहू दे, मज वाटते रे

सामावून मज घेण्या, उशीर रे ? ३



सुरेश पेठे
१७ नोव्हेंबर २००८

Thursday, November 6, 2008

मन उदास उदास

शोधतेय मन माझे , कुठे न काही उमजे
आवरू कसे चित्ता जे , अवखळ ॥ १ ॥


अनंत यत्ने करून , मना धरी आवरून
आले सर्व अंधारून , सर्वगत ॥ २ ॥


चित्ती नुरला आधारा , नयनी अश्रुंच्या धारा
टांगीली ही असिधारा , शिरावर ॥ ३ ॥

अनुदिनी मज राहे , चित्ती चिंता निदिध्यासे
मजला नाही होत से , अनु-ग्रह ॥ ४ ॥


मन उदास उदास , पाहू तिकडे भकास
उरली एकच आंस , दर्शनाची ॥ ५ ॥



सुरेश पेठे
०७ नोव्हेंबर २००८

घर पांगुळले !

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥

दिवस रात्र चक्र चालता
सूर्य चंद्र मार्ग आक्रमिता
अस्तीत्वच त्यांचे नकळे
ग्रहणांत क्षणी जग अंधारले

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥


जग रहाटी ची हीच घडी
तो आहे ना तिला बिघडी
आज मात्र घरी खिचडी !
घडले ते सर्व बिघडले

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥

सुरेश पेठे
१६ ऑक्टोबर २००८

Wednesday, October 8, 2008

" स्माईली " अस्मादिकांना छळी !!

हल्ली आंतरजाल मध्ये स्माईली चे खूप प्रस्थ आहे ! कित्येकदा आधीच मूक भाषणांमधून त्याची मुक्त पणे पेरणी चाललेली असते. कदाचित काहींना ती आंतर्देशीय भाषा चांगली अवगत असावीही. पण आमच्या सारख्यां काहींची कुचंबणा, छळ होतो अशी माझी भावना झाली होती. बरेच दिवस विचार चालू असता निशानाथ माझ्या स्वप्नी आला अणि दृष्टांत च दिला .......



दृष्टांत की मज झाला, निशानाथ स्वप्नी आला । मनीच्या भावना ह्याच्या, गळी चांदण्याच्या माळा

मी आलो आलो म्हणत, अवनी अवतरला । दुडु दुडु जणू, लोकरी गुंडा घरंगळळा......! ...... ॥ १ ॥



समजावून घ्याहो, म्हणती 'स्माईली' मजला । गोल गोळा पिवळा, वेगळा, गुलाम आगळा !

टिंब रेषांची ओळख, फक्त पारख चेहरी । दिसतो नुसता चेहरा, न कळे तो .. तो कि .. ती ? .... ॥ २ ॥



अक्षर बनती शब्द, शब्दांना मिळती अर्थ । भाषेचे नाही बंधन जगतो मुक्त, विरक्त !

गालातच गाली हंसतो, कधी विरमतो ही । मिचकावून डोळे, गुपित तुमचे सांगतो !! .... ॥ ३ ॥



खदा खदा हंसतो, कधी विचकुनि बघतो । त्रासून चिडतो, तर कधी चिडून त्रासतो

चावतो जीभ, चाटी जीभल्या, दाखवी वाकुल्या ? । गंमती जमती सार्‍या माझ्या तच ना दिसल्या ? .... ॥ ४ ॥



गॉगल ह्याचे डोळी डाकूची भुषवी भूमिका । काढताच चष्मा डोळी, गोंधळ करी सर्वांचा

तुमच्या मनीचे भावभांडार रिते करतो. । तुमचीच ना सारी भावभावना दाखवितो .... ॥ ५ ॥



शब्दांच्या पलिकडे , राज्य जगावरी करीतो । अमावस्येला ही कधि, तोंड काळे ना करीतो

माझी ही आहे भाषा, करा आत्मसात थोडीशी । द्या संधी मजला, छळणूक ना समजा त्यांशी ...॥ ६॥



सुरेश पेठे
०७ ऑक्टोबर २००८

बळजबरी

त्या प्रशान्त वेळी नदीच्या किनारी ,

निर्मनुष्य जागी बसलो जवळी

हलकी शी एक सर पावसाची

निकट येण्यास ती होती पुरेशी .... ॥ १ ॥



होते धुंद सगळे तूं ही बेधुंद

डोळ्यात तुझिया वाचला आनंद

मी त्यांत तितकीच रमून गेले

समीप तुझ्या हळूंच सरकले .... ॥ २ ॥



विश्वासले होते तेव्हा तुजवरी

ठसले होते चित्ती रूप निर्मोही

बेभान क्षणी तूं मजला चुंबिले

करकचून मिठीत सामावले ! .... ॥ ३ ॥



अवचित होती ही तुझी धिटाई

धिक्कारून तुज मी तेथून जाई

चिडले, उठले, रागाने बोलले

तिरस्कार मनात ठेवून गेले .... ॥ ४ ॥



अजुनि आठवे ती बळजबरी

अजून ही होते कावरीबावरी

ठेवून सुप्त हेतू तरी अंतरी

मज हवी तुझी ती बळजबरी .... ॥५ ॥



सुरेश पेठे
०६ ऑक्टोबर २००८

कवितेचे पांखरू

मज काय झाले मजला कळेना

कवितेचे पांखरू जरा वळेना ॥



कित्येक दिवसांची गं तडफड

थांबली काय वाटते फडफड ॥



भुर्रकन उडाले कळलें नाही

घरट्यात येणे सांगीतले नाही ॥



घरटे गं रिकामे पांखराविना

उदासिनता मनी, कळी खुलेना ॥



किलबिल पांखराची की थांबली

निळ्याशार देहाची सृष्टी संपली ॥



किती डौलाने ऐटीत बसायचे

कवितेचे पांखरू ने रूसायचे ?

सुरेश पेठे
०४ ऑक्टोबर २००८

शीर्षक गीत

राहूल अनिल आहेत चि 'दादा' , 'शीर्षक गीता' ने पुरा केला वादा ॥

हर्ष होई मज शीर्षक गीताने । गावां शिरोभागी शिरपेंच शोभे ॥ १॥



केली चैतालीने गीताची सुर्वात । मंजूळ स्वरांची होई लयलूट ॥

किती गोड सांगू काय त्यांचे सूर । बाळा-अनुराधा गायलॅ मधूर ॥ २ ॥



संगीताने केली शब्दाची संगत । शब्दांची गं गोडी वाढवी संगीत

ढोलके बांसरी सुंदर साथ । शिर्षक गीतात सगळ्यांचा हात ॥ ३ ॥



सगळ्यांची आता वेशी वर धाव । ' कवितांचे गाव ' वाढला गं भाव ॥

कवितांचे गाव कर्णोपकर्णी गं । जनात मनात भरली गं शीग ॥ ४ ॥



सुरेश पेठे
१८ सप्टेंबर २००८

दोन ढग !

कथा ह्या वर्षीच्या, वर्षा ऋतु तली । सांगतो कथा ऐका लक्ष देऊनी ॥

नभी ढग दोन मदमस्त हत्ती । राखून ते होते आपुलीच मस्ती ॥

आपुल्या जगात ते मस्तीत होते । विहरत विहरत जात होते ॥

म्हणे एक त्यात मीच आहे मोठा । दुसरा कबूल नाही, मी का छोटा ? ॥

होते अजून ढग विखुरलेले । सगळेच तयांना विसरलेले ॥

जवळची दोघे अकस्मात आले । व्हावयाचे तेच आकाशी घडले ॥

सगळे कडून काजळून आले । दिसेना कोण आहेत आपुले ॥

घर्षण होताच आवाज जाहला । कडकडाट , लखलखाट झाला ॥

तांडव नृत्य अन थयथयाट । पृथ्वी वर हाहा:कार घबराट ॥

सपाटून वृष्टी, सगळेच कष्टी । न्हाऊनच निघाली संपूर्ण सॄष्टी ॥

दृष्टी पुढे सर्व अंधारून आले । नभीचे जलकुंभ रिते जहाले ॥

कोणी म्हणाले वादळ रे शमले । कालांतराने नभ निरभ्र झाले ॥

जल रूपे अवतरले ग धरित्री । झरझर सरिता वाहू लागली ॥

अन

मिळाला त्यातच एक अभियंता । मानितसे सर्वथा मनी महत्ता ॥

घालूनि बांध अडविला प्रवाह । दुभंगून गेला सगळा प्रवाह ॥

जनात त्याची होय वाह वाह ॥ हळहळले कोणी कथीले हाय ॥

दुसरी दिशा मिळाली प्रवाहाला । वेगळाले लागले वहावयाला ॥

कौतुक करी कोणी नव्या दिशांचे । पाप ते होतेच ना ताटातूटीचे ॥

वाहते जल हे उतारा कडेच । पारित वळणे उडया घेउनच ॥

किती अडथळे असुंदे तयांला । माहीत आहेच समस्त जलाला ॥

पुढे वाट एकच आहे तयांची । कालांतराने भेट होईल त्यांची ॥

विसावा पुढे नजीक घ्यावयाचा । संगम अटळ तळ रे सागराचा ॥

मार्ग अनेक पोहोचण्या साठी । मुक्काम एकच पायी जगजेठी ॥

सुरेश पेठे
१७ सप्टेंबर २००८

आरती " कवितांचे गावाची "

आज सकाळी सकाळी कोठुनसा गजर कानी आला आणि आरतीचे स्वर कानी पडू लागले. हळूं हळूं स्वर स्पष्ट होउ लागले.तेव्हाच मनाचा पटलासमोर दृष्ये दिसू लागली. ' कवितांचा ' गाव स्पष्ट दिसू लागला. ते देवाचेच रूप होते. काय ती कांती अन काय ते तेज ! माझे तर डोळेच दिपले, आणि जेव्हा मी डोळे उघडले.... अहा हा हा .. त्या दर्शनाचा सोहळा म्या काय वर्णावा ........

मी ही आरती गाऊ लागलेलो होतो....................................





जय जय देवा कवितांच्या गावा , येथे येवोनि हरली भय चिंता

जय जय देवा कवितांच्या गावा , जय जय देवा कवितांच्या गावा ॥ धृ ॥

झळाळून आले कवितांचे गाव , डोळे दिपुनि गेले पहाता ध्यान

अवचीत ठाकले रूप सामोरी , भव्य दिव्य रूप आहे मनोहारी

सगुण निरगुण नकळे मजला , त्रिभुवना मध्ये आगळि किमया ॥ १ ॥

तुझ्या कडे येतांना तोडले पाश , तुझ्या मुळे झाले मोकळे आकाश

तहान भुकेचे झाले विस्मरण , आम्हा सर्वां भेटी आले परब्रह्म

वाटे झाले मम देहाचे सार्थक , मनी आता नको गोष्टी निरर्थक

भक्तांना लागे तुझा लळा वेल्हाळा , आहे गावा मध्ये कविंच्या माळा ! ॥ २ ॥

इथे येण्यासाठी कोणा न मज्जाव , कोणा नको विनवणी वा आर्जव

इथे नाही आषाढी अन कार्तिकी , बाराही महीने भक्त जन येती

भक्तांची कवने तुजसी वर्णिती , मी काय सांगावी नामाची महती

तुझ्यावर आम्ही ठेवली रे आशा , करणार नाही आमची निराशा ॥ ३ ॥

सुरेश पेठे
१३ सप्टेंबर २००८

इतिहास

आजचे वर्तमान हा उद्याचा इतिहास
आत्ताच मांडा,होईल नाही तर विपर्यास !

इतिहास नेहेमी शोधून जमा करावा लागतो
जमा झालेलाच तर इतिहास असतो

इतिहास नुसताच घडलेले सांगत नाही
तर,न सांगीतलेलेच त्यात असते काही !

इतिहास शोधणारा हवा तितकाच निष्णात
नाही तर सारेच की हो जाईल मसणात

इतिहासाचे अर्धवट ज्ञान म्हण्जेच अज्ञान
सज्ञानाने उलगडेल कोड्यांचे विज्ञान

इतिहासाला असतात दोन बाजूं जरी
चांगले काय न वाईट ज्यांचे त्यांवरी !

इतिहासाचा लावावा ज्याचा त्याने अर्थ
होण्यास वेळ लागणार नाही अनर्थ

इतिहासाचा अभ्यास तौलनिक हवा
सांपडेल त्यातूनच अमौलीक ठेवा !!

सुरेश पेठे
११ सप्टेंबर २००८

मराठी अस्मिता

तसा अमिताभ माझा कोणीच लागत नाही....
खरंच कोणीच लागत नाही....

पण सगळे म्हणतात तोच खरा
पण कोण कुठले?का सहन करावा नखरा?

मराठी माणसाने अस्मिताच विकली
नको त्या गोष्टींना मराठी भाळली

शिवाजी नंतर विझला स्वयंप्रकाश
नको ते ते जवळ केले आम्ही पाश

स्वत:चा अपमान, आम्हा सहन न होई
मराठीला आम्ही आपले मानतंच नाही

कोणीही यावे टपली मारूनि जावे
आमचेच चुकले! थोबाडीत मारुन घ्यावे

का केला होता आम्ही अट्टाहास
फुके मारिले ना 'हुतात्मे 'एकशेपाच

भाषावार प्रांत सगळ्यांनी भांडून घेतले
पण आपला तो आपला, दुसरे प्रान्त ही आपले !

बाकीचे चाखती , अन गाती भाषेची महती
आमचे ओरडणे तेव्हढे, फिरली आमची मती

खरं तर आम्ही बाळ, राज ना का आणा ?
जर आम्हीच जपला आपुला मराठी बाणा!

सुरेश पेठे
११ सप्टेंबर २००८

हवी एक शाळा

कवितेच्या गांवी हवी एक शाळा

आम्हाला नं तिचा येई कंटाळा ॥


नेमा मावशीला मुख्याध्यापिका

हाती छडी मात्र देऊं च नका ॥


कवितेच्या गावी शाळा नावाजावी

दादा काका ताई इथे समजावी ॥


आम्ही इथे सारे आहो विद्यार्थी

बघा कुठे आहे आमची गती ? ॥


शिकवा आम्हाला ते रूपक यमक

स्वामीजी सांगा आम्हाला गमक ॥


र्‍ह्स्व दीर्घांची करू उजळणी

अनुप्रासांची होवूं द्या मांडणी ॥


कधी तरी हवी सुट्टी शाळेला

मला मात्र नेमा घंटा बडवायला! ॥


सुरेश पेठे
१० सप्टेंबर २००८

Monday, September 22, 2008

गेली राहून करावयाची कविता

पहाटकाली गेलो हांसत

फुलाफुलांना धुंडित नाचत

भ्रमरामागुनि भ्रमता भ्रमता

गेली राहून करावयाची कविता ॥ १ ॥

तुझ्या संगती फिरलो कांठी

हात तुझ्या त्या माने भंवती

खळखळ, मंजूळ स्वरा ऐकता

गेली राहून करावयाची कविता ॥ २ ॥

रात्र अचानक उलटून जाता

दचकून गेलीस मुखी चुंबिता

चंद्र वरति हांसत होता

गेली राहून करावयाची कविता ॥ ३ ॥


सुरेश पेठे
०७ सप्टेंबर २००८

कशाची ग तूं बनलीस सांग ?

शुभ्र कळ्या पाहता हंसताना

सांगतात तूं कुसुमाची ॥

वर्षा समयी चींब भिजलेली

नव्हे ना तूं जलराणी ॥

उडवित फडकावित पदर

होतेस गायब वायूसंगे ॥

जळि,स्थळि काष्टी, पाषाणी

वाटत राही तूं त्यांच्यावाणी ॥

प्रभात काळी पडती गाली

सांगती किरणे तूं सोन्याची ॥

पौर्णिमेची ती किरणे देती

ग्वाही तूं तर चांदीची

गाल चाविता सखे तु झे मी

सांगती ग तूं लोण्याची

मऊ लोण्याहून कांचन अंग

कशाची ग तूं बनलीस सांग ?


सुरेश पेठे
०७ सप्टेंबर २००८

विरह

गोड विरहाहुनि , आणिक दुसरे ,

जगी नसे दुजे, आळवाया ॥ १ ॥

जगी हेंचि आहे, आठवणींचा खेळ

तोंचि एक मेळ, सत्यरूप ॥ २ ॥

हृदयी कोपर्‍यात, अखंड तिचा वास

विरहाची आंस, वाटतसे ॥ ३ ॥

गोड त्याचे रूप, गोड ती काया

सर्व ती किमया, विरहाने ॥ ४ ॥

मधुर ती स्मृति, अवीट ती मूर्ती

विरहातच तृप्ती, मज लाभे ॥ ५ ॥

तरी अंतकाळी, हीच भेट देवा

विरहाचा मेवा, द्यावा मज ॥ ६ ॥


सुरेश पेठे
०६ सप्टेंबर २००८

अशीच एक वर्षा !


वर्षा काली .. वर्षा आली
मनी कोपरा बळकावून बसली
गाला वरची मोहक खळी
हांसत हंसतां उमले कळी

आली क्षणांत नूर पालटवित
हास्यांचा तो पूर खळाळत
दंत-पंक्ती होत्या चमकत
काय विलक्षण होय करामत

काय सांगू किमया आगळी
सांवळी, मोकळी गळी-साखळी
क्षणात केले मजला जवळी !
हुरहुर लावत गेली सायंकाळी !!


सुरेश पेठे
२६ ऑगस्ट २००८

वेड

संग घडला वाटले पावले
तरी राहीली कसली हुरहूर
ओढ तुझी कायमची मजला
कां उठले मनात काहूर

दिलीस मजला अनंत दर्शने
आंस फिटेना पाहूं , प्रदर्शने
मजला आता ओढ, मुढा !
उगाच का पांघरतो, वेडा

सर्वस्व अर्पिले तुज्या ठायी
सोडव रे आता या समयी
पुरे ना आता माझी फरपट
येऊ दे मजशी तुज निकट

तूं च मनीची घालव तळ्मळ
पुरे तुझी हं आता खळ्खळ
साद घालते अखंड तुजला
मीलनानेच संपवशिल मजला


सुरेश पेठे
२६ ऑगस्ट २००८

Wednesday, August 20, 2008

मी उन्मळलो !

सळसळ माझी तुम्ही ऐकली
होती छाया तुम्हावर धरली
पोचविले ' वर ',आता कुठली ?
कुठली छाया, कुठले गोकुळ ... १

फळाफुलांनी होतो बहरून
तो पर्यन्त जमली सेवा तत्पर
आले जेव्हा घाव घालण्या
क्षणात आली मजला भोवळ ... २

वृक्ष वेली म्हणे सोयरे
फुका तुकाने सांगीतले सारे
पहिला घाव पडला वर्मावर
क्षणात पडलो उन्मळून भूवर ... ३

माझी अडचण 'त्याला ' नव्हती
पण ती आहे तुम्हास भारी
चला बनुद्या सरपण तुमचे
होईन मी हो आभारी !! ... ४


सुरेश पेठे
१८ ऑगस्ट २००८

किती पाहू वाट ?

युगायुगांची तुझी प्रतिक्षा
ठरलेली रे माझी कक्षा
मजला नुमजे वाट,
किती पाहू रे तुझी वाट .....१

भव्य दिव्य तुझी ती किर्ती
मला वाटते रे भीती
पाहीला तुझा तो थाट,
किती पाहू रे तुझी वाट .....२

साथ तुझी जन्मांतरीची
ताटकळण्याची शिक्षा कसची ?
कशी थोपवू उर्मींची लाट,
किती पाहू रे तुझी वाट ..... ३

जन्मभरीच्या श्वासांतूनही
कधी न चिंतिले तुजवाचोनि
सांग कधी येईल पहाट
किती पाहू रे तुझी वाट ..... ४


 सुरेश पेठे
१५ ऑगस्ट २००८

मागणं लई नाही !

मश्गुल होतो माझ्यात मी सदां
धुमकेतू सम अवतरली अनुराधा ..... १
सरले माझे कोषातील जिणे
तेव्हा कुठे कळे कसे उगवणे ..... २
पंचविशीतील संपली नवलाई
वाटते उगवली पहाट नवी ..... ३
बडबड धडपड पुन्हा नव्याने
चार बोबडे बोल ऐकविले प्रेमाने ..... ४
काव्यांजली ग माझी सखी
तुम्ही मायबाप पांचामुखी ..... ५
आपण दर्दी, गर्दीतून निवडून
बोल वाचले अर्थ समजावून ..... ६
मजसाठी केले समुद्रमंथन
कळली असतीलच स्पंदनं! ..... ७
तार छेडीता स्वर ये जुळोन
सच्चेपण दिसले ? स्वरास्वरातून ..... ८
तोच वदवितो बाल मुखातून
वाटे येती शब्द, उंच नभातून ..... ९
पिंड नसे काव्य हा जरी
काय लिहीले जमले कां तरी ? ..... १०
कधी धावतो यमकां मागून
गमकां चे जाय भान हरपून ..... ११
वृत्तांचा मज नसेच पत्ता
लेखणीच मी समजलो सत्ता ..... १२
अनुप्रासांची रंगत संगत
मजला वाटे त्यातचि गम्मत ..... १३
टिका टिप्पण्णी होऊं द्या तर
मजला कळतील माझे बेसूर ! ..... १४
सुंदर! अतिसुंदर! अन अप्रतीम !
छान! छान! उत्तम! उत्तमातित्तम ! ..... १५
अभिप्राय हे एकेकाक्षरातील
जपून द्या हो घात करतील ! ..... १६
बाळपणीची असेल उर्जा
आपण राखा माझा दर्जा ! ..... १७
बाळपणाचे पुरेच कौतुक
टिकाटिप्पण्णी पण नको सहेतुक ! .....१८
महिरपीं ची जरी नसली शोभा
अजुनन व्हावी पुरती शोभा! ..... १९
खडे बोल ऐकवि रे मजला
विनवितो म्हणूनि आहे भुकेला !! ..... २०


सुरेश पेठे
१४ ऑगस्ट २००८

थेंब

भिजत जात पावसात थबकत न्याहाळीत
वेध जणू येत घेत लपले तव पानापानात

कुठे रमत कधी गमत थेंब येती ओथंबत
सहज पणे केले ना, हरीत विश्व पादाक्रांत

कधी कधी सुर्याच्या किरणात नहात
जणू बसविले हे हिरे पांचू कोंदणात

थेंबांची बघून रांग सांगते ही सुस्नात
काय सांगू ? थांबले रे तुझी वाट बघत !


सुरेश पेठे
१३ ऑगस्ट २००८

मेघा बरसे !!

तरसतात रे अमुचे डोळे लागती उंच आकाशी
काळाकुट्ट मेघ भिववितो.. तूंच त्यांतूनि हंसशी

नदी नाल्यांचे पाणी आटले
नयनीं अमुच्या आसूं दाटले

खट्याळपणा तुझा , कुठे कुठे लपून बैसशी
शोधून थकले मी रे , किती अंत माझा पाहशी ?

नुरले श्वास , नुरली आशा
तुजवर राहीला न भंरवसा

अन.........................


मेघ:शाम बरसला दारी , असाच तू बरसतचि रहा
तुझ्या किर्तीचा डंका आम्हा उच्चरवाने ऐकवतचि रहा

खरंच तूं दारी आलास
अन दिलासा दीलास

आता नको घाई परतण्याची, थोडे थोडे थबकुन जा
तुझे सुन्दर शामल रूप, चित्ती अमुच्या ठसवीत रहा

नदी नाले भरभरूनि वाहू दे
सागराशी त्यांची गांठ पडू दे

पुढच्या वर्षी ठरल्यावेळी, विसर न पाडत येशील ना ?
गर्जत गर्जत चमकावित नभ, धड धड धड धड पडशील ना ?


सुरेश पेठे
११ ऑगस्ट २००८

थारोळं !

श्रावणातली गम्मत अगळी
काय सांगू ती तुज सगळी

नभी ढगांची मांदीयाळी
पाऊस पडून गेलेला अवेळी

पानंनपान सज्ज करून आंघोळी
झाडे ओली माती ओली

अन पक्षांची ऐकोन आरोळी
क्षण भर मी गं बावरली

एव्हढ्यात नजर भिरभिरली
रस्तो रस्ती सांचली थारोळी !

प्रतिबिम्बित सारे वसति
प्रतिसृष्टी मज तिथं दिसली

उसळोनि आले की गं वरती
ब्रह्मांडच घेतले गं मी ओटी !!

सुरेश पेठे
०६ ऑगस्ट २००८

गिराण सुटेल ?

सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........धृ

तुझे बरे रे आदित्या, येत्या जात्या असते गिराण
तरीही सुटते घटका भराने, परि अमुचे शिरकाण

आर्त स्वराने केली ओरड
घशास पडली कि रे कोरड
सदानकदाची असे रडा-रड

वर्षों वर्षे पिडित आम्ही, कुडित घेऊनि प्राण
सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........१

उध्दाराच्या हांका ऐकत, उसने आणले जरी उधाण
वर्षे सरली, युगे लोटलि हृदयी वसले पंच:प्राण

वडवानल हा असतो पोटी
विधाने कसली कसली ओठी
न कळे आहे कशास साठी ?

माणुसकीचे नाही दर्शन, कशास हवे ते संविधान
सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........२


सुरेश पे्ठे

०३ ऑगस्ट २००८