Wednesday, August 17, 2011

एकमेव निर्धार !




तुझे हे, अजब नव्हे सरकार ?
मनमोहना, असाच का रे, अधांतरी दरबार  ॥ धृ ॥

सवे घेउनि भ्रष्टाचारी, कधीच ना त्यां आवरी !
भोळी भाबडी जनता इथली तरी करि जयकार   ॥ १ ॥

कसाब आहे इथे जांवई, रोजच मिळे त्यास मलाई
भुकी माणसे बघती तुजकडे मिळेल का आधार   ॥ २ ॥

भ्रष्ट भ्रष्ट जे जे असती, पंक्तीला ते तुझ्याच बसती
एक सूरही ’ विरोधात ’ त्या खपवून नाही घेणार  ॥ ३ ॥

म्हणे आपुले लोकशाहीचे, सरकार इथे आहे जनतेचे
भ्रष्टाचाराचे रूप नव नवे, दाखवीशीस दशावतार   ॥ ४ ॥

जनता इथली मोताद अन्नास, हात लाविशी तरी अण्णास
पापाचे गड्या भरले घडे, आता शीघ्र हो पायउतार  ॥ ५ ॥

असलास कितीही निगरगट्ट , पेटली जनता करी हट्ट
मारीत रट्टा, पुरता गाडू , केलाय एकमेव निर्धार ॥ ६ ॥

सुरेश पेठे
१७ ऑगस्ट २०११

Wednesday, August 10, 2011

न्या येथून !




तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे


केलास उशीर
जरी आजवरी
तृप्त झालॊ हरी
तुझ्या ठायी !


तुझ्याच कृपेने
पोचे इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !


भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता करा त्वरा
न्या येथून !


सुरेश पेठे
११ ऑगस्ट २०११

Wednesday, July 13, 2011

रक्तांचे सडे

पुन्हा ते रक्तांचे सडे
कुणा घालावे साकडे ?

भेकड ?आम्ही भेकड
तरी घेऊ त्यांची कड !

ऐकवाच बोल खडे
सज्ज रहा,चारा खडे

सुरू नेहमीची रड
का सांभाळावे जोखड ?

सुरेश पेठे
१३ जुलै २०११

Tuesday, July 12, 2011

चित्ती बहू समाधान !

मज पाहिजे ते मजला मिळाले
त्या सावळ्याचे दर्शन आज झाले  ॥

पंढरीस जरी नव्हतो मी गेलो
मज बोलला, तुज भेटीला आलो  ॥

कितिक दिसाची आंस मनी होती
सवे मांदियाळि, अन्‌ जनी होती  ॥

फेडिले पारणे, तृप्त झाले मन
दिवाळीच जणू तुझे आगमन  ॥

तुझ्या भेटीने माझा ना उरलो
संतोषलो परिक्षेत उतरलो  ॥

चित्ती बहू समाधान समाधान
तुझ्या समवेत पावो अंतर्धान  ॥

सुरेश पेठे
११ जुलै ११

Monday, July 4, 2011

व्यक्त होण्यासाठी !

भ्रम असतो काहीसा, लेखणी लिही कविता
ही तर दैवी देणगी , व्यक्त तुला होण्यासाठी ॥

भ्रम असतो असाही , ’मी’लिहीतो कवितेला
काही जरी केले नाही, चेहरा बोले ’त्या ’ साठी ॥

प्रत्येकाच्या असतील , नव नव्या कल्पना
तूज साठी एक त्यात, नसे कोणी मारी माथी ॥

तुझा तू शोधी रे मार्ग , अवघड असेलही
वाटणार नाही मग, आलाय ’ लादण्या ’ साठी ॥

आणि जरी थांबलास , नको त्रास नको श्वास
बघू नको मागे वाट , कोणी न, पहाण्यासाठी ॥

व्यक्त होणे तुझ्या साठी, फक्त पुन्हा तुझ्यासाठी
तसदि घेता कशाला , आला आहे जाण्या साठी ॥

सुरेश पेठे
५ जुलै २०११

Thursday, June 16, 2011

त्राण !

बरसत राही घन
आठवांना फुटे पानं
अचंबित झाले मन
पण घेतलीय आण ॥

काय पाहू काय ऐकू
टवकारले गं कान
काहूर आठवणींचा
नाही उरले गं भान ॥

चिंब चिंब चोहिकडे
भिजले सारे आंगण
मज पडले साकडे
नाही साहवे हा ताण ॥

झड झड संपेचना
कसे आवरू रे मन ?
कुठे थांबलासी कान्हा
अंगी उरला ना त्राण ॥

सुरेश पेठे
१६ जून २०११