Friday, April 27, 2018

आसक्ती


आता आपण राहिलो,भोजन भाऊ फक्त ।
भोजन संपले की, उरलो,फक्त विरक्त ॥१

नात्यांची वीण अशीच, जाई उसवत उसवत ।
पुढे काय वाढीले, विचार नाही करवत ॥२

दिवस गेले, गेली वर्षे, काळ जातो वाहवत ।
काळाचाच हा महिमा, कां न, आम्ही वोळखत ॥३

दुनियाची रीत आहे, करा कितीही शिकस्त ।
काय तुझे राहिले आता, का राहतो आसक्त ॥४
सुरेश पेठे
सकाळी ७ वाजता
२८ एप्रील २०१८

Thursday, July 24, 2014

’चपाती’चा खेळ

आपलेच खरे सारे ?
मिसळूनि रहा सारे

खेळ दिवसांचा चार
ठेवा विशुध्द आचार

विस्तवाला बाजू ठेवा
वास्तवाचे भान ठेवा

विचारांची धरा कास
’विचारे’ होई विकास

क्षणाचा पुरेल वेळ
क्षणात संपेल खेळ

उतू नका मातू नका
चपातीशी खेळू नका


सुरेश पेठे
२४ जुलै २०१४

Tuesday, June 4, 2013

आला बाई एकदाचा !
वादळाची चाहूल जरी, घोंगावता वारा
टप टपांची सुरुवात, मना नसे थारा ॥

कडाडला आसमंत, चमकली धरती
घोषा एकच आवाजांचा, खाली अन्‌ वरती ॥

कोरड पडलेली धरा, रापलेले अंग
खळाळत्या जल धारा, त्याचा हवासा संग ॥

आसुसलेले सारेच आणि की भिजलेले
गारा टिपतांना गं, वाकून थकून गेले ॥

सुरेश पेठे
०४ जून २०१३

एक चारॊळी !चंद्र होता साक्षीला पण,
एक मोठी रे समस्या ।

शोधीला दिवस कैसा ?
आज ना रे अमावस्या !!

सुरेश पेठे

१९ ऑगस्ट २०११

( ही चारॊळी लिहून खूप दिवस झालेत पण ह्या ब्लॉगवर टाकली नव्हती , ती आज  ०४ जून २०१३ रोजी टाकीत आहे )

Tuesday, August 28, 2012

वाट


वाट शोधीत येऊनी ,घेतलीय मी गाठ
पाहू ना वाट तुझी ? होऊन गेली पहाट ।।

आता ओढ वाटेची, दाखवशील ना रे तूं ?
वाट लागलीच जरी, आंस तरी परंतू ॥

वाटेत वाटलेले, थकले जणू मी आता
गुंतला कुठे ’वाटा’ड्या, पार समुद्रा साता ॥

सुरेश पेठे
२८-०८-२०१२

Sunday, July 15, 2012

स्वागता तूं मुकशील !
शिडकावा होत होता
ओथंबून आले होते
पण वार्‍या संगे गेले
रे कश्यास आले होते ?

हूर हूर लावायाची
शोभतेस का तुजला ?
का अंत पाहसी आता
धरती होय सुजला

हा हट्ट तुझा कसला
सारी ना रे सुकतील
येशील जेव्हा धो धो
स्वागता तूं मुकशील !

सुरेश पेठे
१५ जुलै २०१२

Friday, June 29, 2012

सांग तरी !

अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
कंटाळलास, कटी घेउनि करी ?

म्हणे वाट पाहसी पुंडलीकाची
गेल्या कित्येक वार्‍या, ना तू सावरी

भक्तांला ओढ तुझी, तुला ही त्यांची
करेल तुलना, कोणी बरोबरी ?

चवकशी ती केली असशीलच
का अडला पुंडलीक आजवरी ?

पुंडलिका सारखे अनेक भक्त गण
येती भेटाया होऊन वारकरी

पाऊस पाण्याची यंदा नाही बेगमी
तरी ठेविला हवाला तुजवरी

काय चुकले बा सांग तू विठ्ठला
काय करावे, आम्हास सांग तरी !


सुरेश पेठे
आषाढी एकादशी,(२०१२) शके १९३४