Wednesday, March 25, 2009

माझ्या प्रदर्शना निमीत्त मनोगत

(मी आणि माझे सहकारी असे आठ जण बालगंधर्व कलादालन , पुणे येथे आज, २६ मार्च २००९ , गुरूवार रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटाने आमच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिध्द चित्रकार व संस्कारभारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीयुत रवि देव ह्यांच्या शुभहस्ते करीत आहोत.
तेथे मी माझ्या चित्रांना मांडतोय, तस्सेच हे मनोगत ही तुम्हा पुढे मांडतोय ! )

माझ्या प्रदर्शना निमीत्त मनोगत

माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय

सप्तरंगांची चाहूल , होती मनी बालपणी
मिळे त्यास अपसूक , माती आणि खतपाणी

पण कधी वाळवंट , कधी दिसे मृगजळ
कधी हाती करवंटी. कधी भरेना ओंजळ

दिन गेले वर्षे गेली, कुठलं फुलपांखरू ?
सुरवंट तस्सा राही , पाहू सारेच विसरू

पण नाही न्याय आहे,’ देवा’ पाशी वाव आहे !
’संस्कारभारती’ ची साथ , सदाचि पाठी आहे !

मज आता ना फिकीर, अर्धे आयु उलटले
पुर्वीचे दिन सगळे , आता सारे पालटले

आता जगतो मस्तीत , रोज रोज काढी चित्र
भेटीला या जीवा शिवा , प्रदर्शना आले मित्र,

हीच सारी करामत , मांडीली माझी तपस्या
आशिर्वाद द्या शुभेच्छा , असुद्या की अमावस्या

माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय


सुरेश पेठे
२६मार्च०९

Tuesday, March 10, 2009

शोध मनाचा..आठ मार्च चा ! ( एक काव्यमय वॄत्तांत )


शोधाला जमलॊ सारे, मनाचे पापुद्रे पाहू
पापुद्रे समुद्रावाणी, उकलण्या कैसे जाऊं ?.......१
..
गावी आला धबधबा, नावातंच दबदबा
ऐसपैस गं बसला, क्षणात वाहू लागला ........२
..
शब्द वेडा शब्दामाजी, ऐकू लागे एकेकाची
फैरी झडल्या झडल्या, पेश सर्वां कवितांची ......३
..
मिनीटे सेकंदाची गं, गणती कैसी करण्या
ओघ ओघा आवरेना, लागे कविता सजण्या! .......४
..
घडल्या क्षणांची पाने, लहरली रानोरानी
कविता कैसी स्फुरावी, सांगु लागली गं वाणी ........५
..
जीव आणिला कानात, वेचिता शब्दन शब्द
धुंदीत रंगले सारे, सामोरे ठाके प्रारब्ध ! .........६
..
पाहूणा न तो राहीला, आपुलकीची दे थाप
संपला तास अमुचा, चूप सारे आपोआप ! ........७
..
धार ही अमृताची, वाटलीही संपू नये
ट्रींग ट्रींग ट्रींग वाजे, वेळच गं संपून ये ! ..........८
..
सत्र दुजे, सज्ज सारे, ऐकूनि आधीचे,वारे
पिऊनि वेडे धुंदीत, फैर झडवी आवडे .........९
..
धावता धावता काटे, "वाढलीत" सारी ताटे
सगळे धुंद ऐकत, भुकेलाही झाले फाटे ! .........१०
..
काक लागे कोकलाला, एक झाले संपवाया
गप्पात भरली पोटे, सत्रास सज्ज तिसऱ्या ! ........११
..
अफलातुनि कल्पना, चार संचात वाटणी
कल्पना लढविल्यात, अलग त्यांची धाटणी .........१२
..
सुरूवात करीती गं, पुढे येऊनि संचात
उघडू लागले सारे, जे दडलेले मनात ! .........१३
..
मनाच्या मनी रंगले, उमलले संच चार
श्रोते आम्ही मंत्रमुग्ध, घड्याळ दाखवे चार !! .........१४
..
निरोपा जमले सारे, मनात एकच ध्यास
चिंतन मनन सार, चला करूया अभ्यास ! .............१५

..

सुरेश पेठे
१०मार्च०९

Thursday, March 5, 2009

शोध मनाचा ! (भाग तीन )

..
मनाचिया बातचीत
केली थोडी अकस्मात
मन नाहीच सोडीत
माझा पिच्छा, मन:शांत ! .... १
..
मन विटले पाहूनि
स्वप्ने अवघी विरली
हटली झांपडे सारी
आशा आकांक्षा नुरली .... २
..
जळमटे झटकली
लक्तरे झळकलीत
मनात जरी निराशा
घाली बाहेर वाळत ! .... ३
..
मनातले मनामध्ये
कधी येई ओठावर
कधी गळे नजरेत
घ्यावे समजून सार ! .... ४
..
माझ्या मना-मनातून
तुला करी आवाहन
तुज साठी अनुष्ठान
मी ते इथे आरंभले ..... ५
..
पाकळ्यांना उलगडू
मनातील अंतरंग
शोध घेऊ कण कण
उधळीत सप्त रंग ..... ६
..
येऊ पुन्हा एकत्रित
फड रंगवु मन- काव्या
झपाटून शोध घेऊं
आश्वासित संचिताचा ! .... ७
..
जीवा-शिवाची ही गांठ
आता मला हवी भेट
आता नको लपंडाव
खेळ पुरे भेट थेट ! ..... ८
..
तुझे अखंड चिंतन
तुला दिले आवंतण
मना शोध ओसंडून
येऊ दे मनी उधाण ! .... ९

..
..
सुरेश पेठे
०५मार्च०९

शोध मनाचा ! (भाग दोन )

मनाच्या शोधा निघालो
शोधीत शोधीत आलो
पण गरज जननी
शोध शोधती अवनी ......... १
....
मन माझे भीर भीर
शोधू पाहे विषयाला
शब्दच त्वरेने येती
विशदा ह्या आशयाला .......२
....
चला पाहूया ना गाभा
आपल्यास सर्व मुभा
म्हणे पोचू अंतरंगा
साथ त्याची पांडुरंगा ....... ३
....
मन ठेवू तुझ्या पायी
सांभाळ रे तुझे ठायी
माझे मन तुझियात
उकलेले आंत आंत.......... ४
..
नवरसांचे आगर
ठाव अथांग सागर
षडरिपूंचे हे स्थान
येथून होय प्रस्थान ......... ५
..
मना सारखे कां होई
ना होई मनासारखे
कायहो सारखे सारखे
क्षणात होई पारखे ! ..........६
..
मन माझे अग्यम ते
आठ तारखेला शोधू
मनीच्या घालमेलीचा
मुहूर्त तेथेचि साधू ? ......७
..
माझ्या मनातले बोल
पोतडीत पडे खोल
उघडू पाहे राहूल
पोतडीतील माहोल ! .......८


..
सुरेश पेठे
०५मार्च०९