Monday, September 22, 2008

गेली राहून करावयाची कविता

पहाटकाली गेलो हांसत

फुलाफुलांना धुंडित नाचत

भ्रमरामागुनि भ्रमता भ्रमता

गेली राहून करावयाची कविता ॥ १ ॥

तुझ्या संगती फिरलो कांठी

हात तुझ्या त्या माने भंवती

खळखळ, मंजूळ स्वरा ऐकता

गेली राहून करावयाची कविता ॥ २ ॥

रात्र अचानक उलटून जाता

दचकून गेलीस मुखी चुंबिता

चंद्र वरति हांसत होता

गेली राहून करावयाची कविता ॥ ३ ॥


सुरेश पेठे
०७ सप्टेंबर २००८

कशाची ग तूं बनलीस सांग ?

शुभ्र कळ्या पाहता हंसताना

सांगतात तूं कुसुमाची ॥

वर्षा समयी चींब भिजलेली

नव्हे ना तूं जलराणी ॥

उडवित फडकावित पदर

होतेस गायब वायूसंगे ॥

जळि,स्थळि काष्टी, पाषाणी

वाटत राही तूं त्यांच्यावाणी ॥

प्रभात काळी पडती गाली

सांगती किरणे तूं सोन्याची ॥

पौर्णिमेची ती किरणे देती

ग्वाही तूं तर चांदीची

गाल चाविता सखे तु झे मी

सांगती ग तूं लोण्याची

मऊ लोण्याहून कांचन अंग

कशाची ग तूं बनलीस सांग ?


सुरेश पेठे
०७ सप्टेंबर २००८

विरह

गोड विरहाहुनि , आणिक दुसरे ,

जगी नसे दुजे, आळवाया ॥ १ ॥

जगी हेंचि आहे, आठवणींचा खेळ

तोंचि एक मेळ, सत्यरूप ॥ २ ॥

हृदयी कोपर्‍यात, अखंड तिचा वास

विरहाची आंस, वाटतसे ॥ ३ ॥

गोड त्याचे रूप, गोड ती काया

सर्व ती किमया, विरहाने ॥ ४ ॥

मधुर ती स्मृति, अवीट ती मूर्ती

विरहातच तृप्ती, मज लाभे ॥ ५ ॥

तरी अंतकाळी, हीच भेट देवा

विरहाचा मेवा, द्यावा मज ॥ ६ ॥


सुरेश पेठे
०६ सप्टेंबर २००८

अशीच एक वर्षा !


वर्षा काली .. वर्षा आली
मनी कोपरा बळकावून बसली
गाला वरची मोहक खळी
हांसत हंसतां उमले कळी

आली क्षणांत नूर पालटवित
हास्यांचा तो पूर खळाळत
दंत-पंक्ती होत्या चमकत
काय विलक्षण होय करामत

काय सांगू किमया आगळी
सांवळी, मोकळी गळी-साखळी
क्षणात केले मजला जवळी !
हुरहुर लावत गेली सायंकाळी !!


सुरेश पेठे
२६ ऑगस्ट २००८

वेड

संग घडला वाटले पावले
तरी राहीली कसली हुरहूर
ओढ तुझी कायमची मजला
कां उठले मनात काहूर

दिलीस मजला अनंत दर्शने
आंस फिटेना पाहूं , प्रदर्शने
मजला आता ओढ, मुढा !
उगाच का पांघरतो, वेडा

सर्वस्व अर्पिले तुज्या ठायी
सोडव रे आता या समयी
पुरे ना आता माझी फरपट
येऊ दे मजशी तुज निकट

तूं च मनीची घालव तळ्मळ
पुरे तुझी हं आता खळ्खळ
साद घालते अखंड तुजला
मीलनानेच संपवशिल मजला


सुरेश पेठे
२६ ऑगस्ट २००८