Tuesday, August 28, 2012

वाट


वाट शोधीत येऊनी ,घेतलीय मी गाठ
पाहू ना वाट तुझी ? होऊन गेली पहाट ।।

आता ओढ वाटेची, दाखवशील ना रे तूं ?
वाट लागलीच जरी, आंस तरी परंतू ॥

वाटेत वाटलेले, थकले जणू मी आता
गुंतला कुठे ’वाटा’ड्या, पार समुद्रा साता ॥

सुरेश पेठे
२८-०८-२०१२

Sunday, July 15, 2012

स्वागता तूं मुकशील !




शिडकावा होत होता
ओथंबून आले होते
पण वार्‍या संगे गेले
रे कश्यास आले होते ?

हूर हूर लावायाची
शोभतेस का तुजला ?
का अंत पाहसी आता
धरती होय सुजला

हा हट्ट तुझा कसला
सारी ना रे सुकतील
येशील जेव्हा धो धो
स्वागता तूं मुकशील !

सुरेश पेठे
१५ जुलै २०१२

Friday, June 29, 2012

सांग तरी !





अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
कंटाळलास, कटी घेउनि करी ?

म्हणे वाट पाहसी पुंडलीकाची
गेल्या कित्येक वार्‍या, ना तू सावरी

भक्तांला ओढ तुझी, तुला ही त्यांची
करेल तुलना, कोणी बरोबरी ?

चवकशी ती केली असशीलच
का अडला पुंडलीक आजवरी ?

पुंडलिका सारखे अनेक भक्त गण
येती भेटाया होऊन वारकरी

पाऊस पाण्याची यंदा नाही बेगमी
तरी ठेविला हवाला तुजवरी

काय चुकले बा सांग तू विठ्ठला
काय करावे, आम्हास सांग तरी !


सुरेश पेठे
आषाढी एकादशी,(२०१२) शके १९३४