Wednesday, October 8, 2008

आरती " कवितांचे गावाची "

आज सकाळी सकाळी कोठुनसा गजर कानी आला आणि आरतीचे स्वर कानी पडू लागले. हळूं हळूं स्वर स्पष्ट होउ लागले.तेव्हाच मनाचा पटलासमोर दृष्ये दिसू लागली. ' कवितांचा ' गाव स्पष्ट दिसू लागला. ते देवाचेच रूप होते. काय ती कांती अन काय ते तेज ! माझे तर डोळेच दिपले, आणि जेव्हा मी डोळे उघडले.... अहा हा हा .. त्या दर्शनाचा सोहळा म्या काय वर्णावा ........

मी ही आरती गाऊ लागलेलो होतो....................................





जय जय देवा कवितांच्या गावा , येथे येवोनि हरली भय चिंता

जय जय देवा कवितांच्या गावा , जय जय देवा कवितांच्या गावा ॥ धृ ॥

झळाळून आले कवितांचे गाव , डोळे दिपुनि गेले पहाता ध्यान

अवचीत ठाकले रूप सामोरी , भव्य दिव्य रूप आहे मनोहारी

सगुण निरगुण नकळे मजला , त्रिभुवना मध्ये आगळि किमया ॥ १ ॥

तुझ्या कडे येतांना तोडले पाश , तुझ्या मुळे झाले मोकळे आकाश

तहान भुकेचे झाले विस्मरण , आम्हा सर्वां भेटी आले परब्रह्म

वाटे झाले मम देहाचे सार्थक , मनी आता नको गोष्टी निरर्थक

भक्तांना लागे तुझा लळा वेल्हाळा , आहे गावा मध्ये कविंच्या माळा ! ॥ २ ॥

इथे येण्यासाठी कोणा न मज्जाव , कोणा नको विनवणी वा आर्जव

इथे नाही आषाढी अन कार्तिकी , बाराही महीने भक्त जन येती

भक्तांची कवने तुजसी वर्णिती , मी काय सांगावी नामाची महती

तुझ्यावर आम्ही ठेवली रे आशा , करणार नाही आमची निराशा ॥ ३ ॥

सुरेश पेठे
१३ सप्टेंबर २००८

No comments: