Wednesday, October 8, 2008

दोन ढग !

कथा ह्या वर्षीच्या, वर्षा ऋतु तली । सांगतो कथा ऐका लक्ष देऊनी ॥

नभी ढग दोन मदमस्त हत्ती । राखून ते होते आपुलीच मस्ती ॥

आपुल्या जगात ते मस्तीत होते । विहरत विहरत जात होते ॥

म्हणे एक त्यात मीच आहे मोठा । दुसरा कबूल नाही, मी का छोटा ? ॥

होते अजून ढग विखुरलेले । सगळेच तयांना विसरलेले ॥

जवळची दोघे अकस्मात आले । व्हावयाचे तेच आकाशी घडले ॥

सगळे कडून काजळून आले । दिसेना कोण आहेत आपुले ॥

घर्षण होताच आवाज जाहला । कडकडाट , लखलखाट झाला ॥

तांडव नृत्य अन थयथयाट । पृथ्वी वर हाहा:कार घबराट ॥

सपाटून वृष्टी, सगळेच कष्टी । न्हाऊनच निघाली संपूर्ण सॄष्टी ॥

दृष्टी पुढे सर्व अंधारून आले । नभीचे जलकुंभ रिते जहाले ॥

कोणी म्हणाले वादळ रे शमले । कालांतराने नभ निरभ्र झाले ॥

जल रूपे अवतरले ग धरित्री । झरझर सरिता वाहू लागली ॥

अन

मिळाला त्यातच एक अभियंता । मानितसे सर्वथा मनी महत्ता ॥

घालूनि बांध अडविला प्रवाह । दुभंगून गेला सगळा प्रवाह ॥

जनात त्याची होय वाह वाह ॥ हळहळले कोणी कथीले हाय ॥

दुसरी दिशा मिळाली प्रवाहाला । वेगळाले लागले वहावयाला ॥

कौतुक करी कोणी नव्या दिशांचे । पाप ते होतेच ना ताटातूटीचे ॥

वाहते जल हे उतारा कडेच । पारित वळणे उडया घेउनच ॥

किती अडथळे असुंदे तयांला । माहीत आहेच समस्त जलाला ॥

पुढे वाट एकच आहे तयांची । कालांतराने भेट होईल त्यांची ॥

विसावा पुढे नजीक घ्यावयाचा । संगम अटळ तळ रे सागराचा ॥

मार्ग अनेक पोहोचण्या साठी । मुक्काम एकच पायी जगजेठी ॥

सुरेश पेठे
१७ सप्टेंबर २००८

No comments: