Wednesday, August 20, 2008

मी उन्मळलो !

सळसळ माझी तुम्ही ऐकली
होती छाया तुम्हावर धरली
पोचविले ' वर ',आता कुठली ?
कुठली छाया, कुठले गोकुळ ... १

फळाफुलांनी होतो बहरून
तो पर्यन्त जमली सेवा तत्पर
आले जेव्हा घाव घालण्या
क्षणात आली मजला भोवळ ... २

वृक्ष वेली म्हणे सोयरे
फुका तुकाने सांगीतले सारे
पहिला घाव पडला वर्मावर
क्षणात पडलो उन्मळून भूवर ... ३

माझी अडचण 'त्याला ' नव्हती
पण ती आहे तुम्हास भारी
चला बनुद्या सरपण तुमचे
होईन मी हो आभारी !! ... ४


सुरेश पेठे
१८ ऑगस्ट २००८

किती पाहू वाट ?

युगायुगांची तुझी प्रतिक्षा
ठरलेली रे माझी कक्षा
मजला नुमजे वाट,
किती पाहू रे तुझी वाट .....१

भव्य दिव्य तुझी ती किर्ती
मला वाटते रे भीती
पाहीला तुझा तो थाट,
किती पाहू रे तुझी वाट .....२

साथ तुझी जन्मांतरीची
ताटकळण्याची शिक्षा कसची ?
कशी थोपवू उर्मींची लाट,
किती पाहू रे तुझी वाट ..... ३

जन्मभरीच्या श्वासांतूनही
कधी न चिंतिले तुजवाचोनि
सांग कधी येईल पहाट
किती पाहू रे तुझी वाट ..... ४


 सुरेश पेठे
१५ ऑगस्ट २००८

मागणं लई नाही !

मश्गुल होतो माझ्यात मी सदां
धुमकेतू सम अवतरली अनुराधा ..... १
सरले माझे कोषातील जिणे
तेव्हा कुठे कळे कसे उगवणे ..... २
पंचविशीतील संपली नवलाई
वाटते उगवली पहाट नवी ..... ३
बडबड धडपड पुन्हा नव्याने
चार बोबडे बोल ऐकविले प्रेमाने ..... ४
काव्यांजली ग माझी सखी
तुम्ही मायबाप पांचामुखी ..... ५
आपण दर्दी, गर्दीतून निवडून
बोल वाचले अर्थ समजावून ..... ६
मजसाठी केले समुद्रमंथन
कळली असतीलच स्पंदनं! ..... ७
तार छेडीता स्वर ये जुळोन
सच्चेपण दिसले ? स्वरास्वरातून ..... ८
तोच वदवितो बाल मुखातून
वाटे येती शब्द, उंच नभातून ..... ९
पिंड नसे काव्य हा जरी
काय लिहीले जमले कां तरी ? ..... १०
कधी धावतो यमकां मागून
गमकां चे जाय भान हरपून ..... ११
वृत्तांचा मज नसेच पत्ता
लेखणीच मी समजलो सत्ता ..... १२
अनुप्रासांची रंगत संगत
मजला वाटे त्यातचि गम्मत ..... १३
टिका टिप्पण्णी होऊं द्या तर
मजला कळतील माझे बेसूर ! ..... १४
सुंदर! अतिसुंदर! अन अप्रतीम !
छान! छान! उत्तम! उत्तमातित्तम ! ..... १५
अभिप्राय हे एकेकाक्षरातील
जपून द्या हो घात करतील ! ..... १६
बाळपणीची असेल उर्जा
आपण राखा माझा दर्जा ! ..... १७
बाळपणाचे पुरेच कौतुक
टिकाटिप्पण्णी पण नको सहेतुक ! .....१८
महिरपीं ची जरी नसली शोभा
अजुनन व्हावी पुरती शोभा! ..... १९
खडे बोल ऐकवि रे मजला
विनवितो म्हणूनि आहे भुकेला !! ..... २०


सुरेश पेठे
१४ ऑगस्ट २००८

थेंब

भिजत जात पावसात थबकत न्याहाळीत
वेध जणू येत घेत लपले तव पानापानात

कुठे रमत कधी गमत थेंब येती ओथंबत
सहज पणे केले ना, हरीत विश्व पादाक्रांत

कधी कधी सुर्याच्या किरणात नहात
जणू बसविले हे हिरे पांचू कोंदणात

थेंबांची बघून रांग सांगते ही सुस्नात
काय सांगू ? थांबले रे तुझी वाट बघत !


सुरेश पेठे
१३ ऑगस्ट २००८

मेघा बरसे !!

तरसतात रे अमुचे डोळे लागती उंच आकाशी
काळाकुट्ट मेघ भिववितो.. तूंच त्यांतूनि हंसशी

नदी नाल्यांचे पाणी आटले
नयनीं अमुच्या आसूं दाटले

खट्याळपणा तुझा , कुठे कुठे लपून बैसशी
शोधून थकले मी रे , किती अंत माझा पाहशी ?

नुरले श्वास , नुरली आशा
तुजवर राहीला न भंरवसा

अन.........................


मेघ:शाम बरसला दारी , असाच तू बरसतचि रहा
तुझ्या किर्तीचा डंका आम्हा उच्चरवाने ऐकवतचि रहा

खरंच तूं दारी आलास
अन दिलासा दीलास

आता नको घाई परतण्याची, थोडे थोडे थबकुन जा
तुझे सुन्दर शामल रूप, चित्ती अमुच्या ठसवीत रहा

नदी नाले भरभरूनि वाहू दे
सागराशी त्यांची गांठ पडू दे

पुढच्या वर्षी ठरल्यावेळी, विसर न पाडत येशील ना ?
गर्जत गर्जत चमकावित नभ, धड धड धड धड पडशील ना ?


सुरेश पेठे
११ ऑगस्ट २००८

थारोळं !

श्रावणातली गम्मत अगळी
काय सांगू ती तुज सगळी

नभी ढगांची मांदीयाळी
पाऊस पडून गेलेला अवेळी

पानंनपान सज्ज करून आंघोळी
झाडे ओली माती ओली

अन पक्षांची ऐकोन आरोळी
क्षण भर मी गं बावरली

एव्हढ्यात नजर भिरभिरली
रस्तो रस्ती सांचली थारोळी !

प्रतिबिम्बित सारे वसति
प्रतिसृष्टी मज तिथं दिसली

उसळोनि आले की गं वरती
ब्रह्मांडच घेतले गं मी ओटी !!

सुरेश पेठे
०६ ऑगस्ट २००८

गिराण सुटेल ?

सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........धृ

तुझे बरे रे आदित्या, येत्या जात्या असते गिराण
तरीही सुटते घटका भराने, परि अमुचे शिरकाण

आर्त स्वराने केली ओरड
घशास पडली कि रे कोरड
सदानकदाची असे रडा-रड

वर्षों वर्षे पिडित आम्ही, कुडित घेऊनि प्राण
सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........१

उध्दाराच्या हांका ऐकत, उसने आणले जरी उधाण
वर्षे सरली, युगे लोटलि हृदयी वसले पंच:प्राण

वडवानल हा असतो पोटी
विधाने कसली कसली ओठी
न कळे आहे कशास साठी ?

माणुसकीचे नाही दर्शन, कशास हवे ते संविधान
सुटेल कां हो गिराण अमुचे सुटेल कां हो गिराण.........२


सुरेश पे्ठे

०३ ऑगस्ट २००८