Wednesday, October 8, 2008

" स्माईली " अस्मादिकांना छळी !!

हल्ली आंतरजाल मध्ये स्माईली चे खूप प्रस्थ आहे ! कित्येकदा आधीच मूक भाषणांमधून त्याची मुक्त पणे पेरणी चाललेली असते. कदाचित काहींना ती आंतर्देशीय भाषा चांगली अवगत असावीही. पण आमच्या सारख्यां काहींची कुचंबणा, छळ होतो अशी माझी भावना झाली होती. बरेच दिवस विचार चालू असता निशानाथ माझ्या स्वप्नी आला अणि दृष्टांत च दिला .......



दृष्टांत की मज झाला, निशानाथ स्वप्नी आला । मनीच्या भावना ह्याच्या, गळी चांदण्याच्या माळा

मी आलो आलो म्हणत, अवनी अवतरला । दुडु दुडु जणू, लोकरी गुंडा घरंगळळा......! ...... ॥ १ ॥



समजावून घ्याहो, म्हणती 'स्माईली' मजला । गोल गोळा पिवळा, वेगळा, गुलाम आगळा !

टिंब रेषांची ओळख, फक्त पारख चेहरी । दिसतो नुसता चेहरा, न कळे तो .. तो कि .. ती ? .... ॥ २ ॥



अक्षर बनती शब्द, शब्दांना मिळती अर्थ । भाषेचे नाही बंधन जगतो मुक्त, विरक्त !

गालातच गाली हंसतो, कधी विरमतो ही । मिचकावून डोळे, गुपित तुमचे सांगतो !! .... ॥ ३ ॥



खदा खदा हंसतो, कधी विचकुनि बघतो । त्रासून चिडतो, तर कधी चिडून त्रासतो

चावतो जीभ, चाटी जीभल्या, दाखवी वाकुल्या ? । गंमती जमती सार्‍या माझ्या तच ना दिसल्या ? .... ॥ ४ ॥



गॉगल ह्याचे डोळी डाकूची भुषवी भूमिका । काढताच चष्मा डोळी, गोंधळ करी सर्वांचा

तुमच्या मनीचे भावभांडार रिते करतो. । तुमचीच ना सारी भावभावना दाखवितो .... ॥ ५ ॥



शब्दांच्या पलिकडे , राज्य जगावरी करीतो । अमावस्येला ही कधि, तोंड काळे ना करीतो

माझी ही आहे भाषा, करा आत्मसात थोडीशी । द्या संधी मजला, छळणूक ना समजा त्यांशी ...॥ ६॥



सुरेश पेठे
०७ ऑक्टोबर २००८

No comments: