Thursday, November 6, 2008

मन उदास उदास

शोधतेय मन माझे , कुठे न काही उमजे
आवरू कसे चित्ता जे , अवखळ ॥ १ ॥


अनंत यत्ने करून , मना धरी आवरून
आले सर्व अंधारून , सर्वगत ॥ २ ॥


चित्ती नुरला आधारा , नयनी अश्रुंच्या धारा
टांगीली ही असिधारा , शिरावर ॥ ३ ॥

अनुदिनी मज राहे , चित्ती चिंता निदिध्यासे
मजला नाही होत से , अनु-ग्रह ॥ ४ ॥


मन उदास उदास , पाहू तिकडे भकास
उरली एकच आंस , दर्शनाची ॥ ५ ॥



सुरेश पेठे
०७ नोव्हेंबर २००८

घर पांगुळले !

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥

दिवस रात्र चक्र चालता
सूर्य चंद्र मार्ग आक्रमिता
अस्तीत्वच त्यांचे नकळे
ग्रहणांत क्षणी जग अंधारले

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥


जग रहाटी ची हीच घडी
तो आहे ना तिला बिघडी
आज मात्र घरी खिचडी !
घडले ते सर्व बिघडले

मीच जागची न राहीले
घर माझे पांगुळले पांगुळले ! ॥

सुरेश पेठे
१६ ऑक्टोबर २००८