Thursday, May 28, 2009

गोविंद गोपाल !

होतो गर्भात, पहूडलेला माझा मी अति शांत
सुखावलेली ती माय चुळबुळीने माझ्या आंत

बाहेर आलो या जगी, तुमच्यात मी रहायला
पण ? काय ही गडबड मिळतेय ऐकायला ?

अरे देवा, कशाला तूं , मजला इथेच धाडले 
आईविना  करू काय आधीच का नाही गाडले ?

माते तूं गेलीस, सोडूनि मला घालूनि जन्माला
कसे साहू आता कां न तत्क्षणी मज उन्माळला

ऐकू येतेय कुजबुज, कोण मला सांभाळील
हाय दैवा, क्रूर अशी थट्टा कां रे आरंभलीय ?

हा गोंधळ चालला असता अवतरली माय
लेकरूं स्वत:चेच समजून उचलले काय ?

क्षणात घेई मांडीवर पहूडलो पदरांत
जणु काय मजला पुन्ह:श्च घेतले उदरांत !

भूक माझी कळली तिला, ऐकून माझा आकांत
स्तनाशी कवटाळून घेताच झालो की मी शांत !

हळूंच मी पाहतोय मातेचे ते सुंदर मुख
शेजारीच शांत निजविलेला माझा बंधू एक

अल्पस्वल्प बुध्दीला माझ्या, काही कळलंच नाही
सुखावलेली माय, आम्हा दोघात काय ते पाही ?

सुखावले इतरे जन, शांत झाला कोलाहल
आम्हांकडे पहात माय म्हणे, गोविंद गोपाल !!

सुरेश पेठे
२८ मे ०९

Wednesday, May 27, 2009

पोरका ?


मी अबोल जरी, जन तरी बोल बोली
म्हणती ’रूपाचा तोरा’ मिरवित चाली

दुर्लक्षित करते, कोणीही बोलो काही
मी माझ्यात मजला फिकीर त्यांची नाही !

कां लागू तोंडी, दुतोंडी, काय मज कमी ?
माझं बाळ जवळी, हीच मजला हमी

मी माझ्या बाळात मजला न पर्वा काही
गोड गं छकुला त्यातंच रमून जाई !

******************************

काय ?गलका बाहेर होतो कोलाहल
म्हणे माय गेली, लेकरू मागे राहीलं

चर्र झाले हृदयी , ऐकोनी टाहो त्याचा
क्षणात गेले ,उचलोनी आणीले त्याला

रूप त्याचे काळे वा गोरे मज ना ठावे
छाती घेतला गोळा, हृदयी मनोभावे

माझा जसा, हाहि तसाच ना बाळ मज
आईविना पोरका कोण म्हणेल आज ?

मीहि ओली बाळंतीण फुटलेला पान्हा
आई जिवंत त्यांची ओटीत दोन कान्हा !

.
सुरेश पेठे
२७ मे ०९


 

Monday, May 25, 2009

हकालपट्टी


मी सांगीतले म्हणतो ?
कळली रे लुच्चेगिरी
टाहो फोडीत येईन
हांकलेस मला जरी !
.
विरहाग्नीच्या ज्वालात
म्हणून का जाळतोस ?
कवटाळून घेतले
आता मला टाळतोस !
.
म्हटले होते ना तुला
एकदा संपव मला
एकदाच मिटव रे
अधांतरी का टांगला ?
.
पुन्हा तुला विनवतो
विचार नको बदलू
उघड दार, आत घे
मजला नको रे टाळू !
.
सहन नाही होणार
असली हकालपट्टी
पुन्हा यायला लागेल
कराया खरड पट्टी !
.
.
सुरेश पेठे
२४मे०९