Saturday, December 27, 2008

सामावयाची

      ( १ )

देवा तुझे रे अनंत उपकार
दिलास तू देहा सगुण आकार

दिलेस मजला तू सगे सोयरे
पाश अडकवुनि घेतले सारे

ज्यांच्या ज्यांच्या सवे झिजवली काया
उगाच वाटते जवळी असाया

ही पण माया ! मज तूच लावली
सुखात जावे हे दिवस म्हणुनी

जीव लावुनी घेतलेले होते रे
गळी लावले पाशांचे हारतुरे

पण तू आहेस आपमतलबी !
कावे असले येतात मज ध्यानी

काय साधसी अडकवुनि पाशा
कळले कावे सारे मज आताशा !

तट तट तुटतांना होती क्लेश
इच्छा जाण्याची, न राहो लवलेश

तजवीज तुझी आली माझ्या ध्यानी
इशारे लगेच उमगले मनी

तुझी संगत मज बहुमोलाची
आंस एक तुझ्यात सामावयाची

मी तर आहे रे तय्यार केव्हाचा
सांग पुढील मुक्काम करायचा ?

सुरेश पेठे
२८ डिसेंबर २००८

      ( २ )

मी निघालो मजला सामवायला
आलो इथे राम राम करायला

धन्य मज केले आपण जरी ही
निघावयास हवे आता तरी ही !

नसे राग लोभ, न काही जिव्हाळा
नुरे काही द्याया नुरला हवाला

नको पाश इथले जवळी आता
मार्गस्थ राहू द्या एकटा एकटा

केलेत बहुत प्रेम मजवरी
कसा होईन त्यासाठी उतराई

निघालो आता मजला सामवाया
आलो अखेरचा राम राम द्याया !

सुरेश पेठे
२८ डिसेंबर २००८

      ( ३ )

कविता कविताच असते
अर्थ नसतो त्यात दुसरा

का उगाच लावित बसता
का उगा कवीं वर घसरा ?

त्याच्या मनीचे ते सांगणे
मी मांडला फक्त पसारा!

आंस मनीची तीव्र दिसली
मागताहे म्हणून तो आसरा !

आपुल्या मनीच्या अर्थांना
चिकटवू नका, ते विसरा

सुरेश पेठे
२९ डिसेंबर २००८

      ( ४ )

विसरलात जे नको ते
मज धन्य धन्य केले
उपकार फेडणे अशक्य
न जन्मी या ते होणे !

आता मला तुम्ही हॊ
निरोप द्या अखेरचा
वाट ही नव्हेच माझी
चुकलाच, मार्ग भलता !

संपला रे इथला सर्ग
सापडला मज नवमार्ग
का घालवू काल व्यर्थ
पाहू द्या मज तो स्वर्ग !

जन्म इथला घालवलेला
स्मरणात नित्य ठेवीन
आठवांची सर्व पुष्पे
नित्य नित्य वाहीन !

सुरेश पेठे
३० डिसेंबर २००८

No comments: