Tuesday, July 12, 2011

चित्ती बहू समाधान !

मज पाहिजे ते मजला मिळाले
त्या सावळ्याचे दर्शन आज झाले  ॥

पंढरीस जरी नव्हतो मी गेलो
मज बोलला, तुज भेटीला आलो  ॥

कितिक दिसाची आंस मनी होती
सवे मांदियाळि, अन्‌ जनी होती  ॥

फेडिले पारणे, तृप्त झाले मन
दिवाळीच जणू तुझे आगमन  ॥

तुझ्या भेटीने माझा ना उरलो
संतोषलो परिक्षेत उतरलो  ॥

चित्ती बहू समाधान समाधान
तुझ्या समवेत पावो अंतर्धान  ॥

सुरेश पेठे
११ जुलै ११

Monday, July 4, 2011

व्यक्त होण्यासाठी !

भ्रम असतो काहीसा, लेखणी लिही कविता
ही तर दैवी देणगी , व्यक्त तुला होण्यासाठी ॥

भ्रम असतो असाही , ’मी’लिहीतो कवितेला
काही जरी केले नाही, चेहरा बोले ’त्या ’ साठी ॥

प्रत्येकाच्या असतील , नव नव्या कल्पना
तूज साठी एक त्यात, नसे कोणी मारी माथी ॥

तुझा तू शोधी रे मार्ग , अवघड असेलही
वाटणार नाही मग, आलाय ’ लादण्या ’ साठी ॥

आणि जरी थांबलास , नको त्रास नको श्वास
बघू नको मागे वाट , कोणी न, पहाण्यासाठी ॥

व्यक्त होणे तुझ्या साठी, फक्त पुन्हा तुझ्यासाठी
तसदि घेता कशाला , आला आहे जाण्या साठी ॥

सुरेश पेठे
५ जुलै २०११

Thursday, June 16, 2011

त्राण !

बरसत राही घन
आठवांना फुटे पानं
अचंबित झाले मन
पण घेतलीय आण ॥

काय पाहू काय ऐकू
टवकारले गं कान
काहूर आठवणींचा
नाही उरले गं भान ॥

चिंब चिंब चोहिकडे
भिजले सारे आंगण
मज पडले साकडे
नाही साहवे हा ताण ॥

झड झड संपेचना
कसे आवरू रे मन ?
कुठे थांबलासी कान्हा
अंगी उरला ना त्राण ॥

सुरेश पेठे
१६ जून २०११

Thursday, October 21, 2010

सीमोल्लंघन


आजचा दिवस सीमोल्लंघनाचा
दिसे मार्ग धूसर सीमारेषांचा

उल्लंघण्या साठी नुरलीय सीमा
उगाचचना आटा पिटा अशांचा ?

ज्याने त्याने ना बळकावली क्षेत्रे
प्याला आपल्याला भरून विषाचा

विसरला झाडांत लपवलेली ?
तळपवा त्यां, शोध घ्या या चोरांचा

देता लाथाडून, घेता हाती शस्त्रे
सार्थ होई दिन सीमोल्लंघनाचा ॥

सुरेश पेठे
विजयादशमी शके १९३२



काव्यांजली वर प्रकाशित ही त्याची लिंक

http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=41419010&tid=5528886850144439640

Sunday, July 25, 2010

गंमत जंमत !



कोणी म्हणतंय दादा मजला
कोणी बनवतंय मज बाबा
नात्यांची वीण संपेचना कधी
बनवित काका अन आजोबा !
.
विश्वाची ह्या असली नातीगोती
जमविली जाती मानव जाती !
एव्हढीच ओळख ह्या नात्यांची
जगता जगताच चिकटती !
.
पल्याड होता जरासे थोडेसे
ती विसरती पाहता पाहता
दोन क्षण घालवू आनंदाने
फिरून मूळ पदावर येता !!
.
हरकून जाऊया नात्यांतच
दोन दिसांची इथली गंमत
आयुष्याच्या ह्या अखेरीस तरी
सुखे वाढवू त्यातच जंमत !

.
.
.
सुरेश पेठे
२९एप्रिल०९

सदरहू कविता मागेच काव्यांजली ह्या ऑर्कूट च्या कम्युनिटी वरून प्रकाशित झाली होती पण ती माझ्या ब्लॉग वर टाकायची राहिली. ही तेथली लींक,

Friday, November 27, 2009

शाप

शाप
वाहिलेली शब्द फुले
यातना ज्या पाहिलेल्या
जखमांची भळभळ
संवेदना जपलेल्या !

ज्योतीला लागता ज्योत
फिटे अंधाराचे जाळे
वारा आगीला लागता
सर्वस्वच ना, ती जाळे !

जिवंत आहे ? मेलेला ?
आगीतही लोळलेला
मरणाच्या दारातही
धर्मच नाही कळला !!

सुरेश पेठे
२८.११.०९

Wednesday, August 19, 2009

निसटलेले क्षण




निसटून गेलेले ते क्षण क्षण
येती अवचित कश्यास माहीत ?
जाता येता मन करती विषण्ण !
निसटून गेलेले ते क्षण क्षण

आठवणींचे जमती कण कण
लढविले गेले रण आणि रण
थेंबां सारखे पडती टपकन
निसटून गेलेले ते क्षण क्षण

जडावले मन मन, मण मण !
ठरविले आता नको आठवण
झुरळावाणी टाकूया झटकून ?
निसटून गेलेले ते क्षण क्षण

मनासारखे येती कधी जुळून ?
मनास जातील सारे वगळून
मनोमनी राहीलना उलझन !
निसटून गेलेले ते क्षण क्षण

सुरेश पेठे
२० ०८ २००९