Tuesday, March 10, 2009

शोध मनाचा..आठ मार्च चा ! ( एक काव्यमय वॄत्तांत )


शोधाला जमलॊ सारे, मनाचे पापुद्रे पाहू
पापुद्रे समुद्रावाणी, उकलण्या कैसे जाऊं ?.......१
..
गावी आला धबधबा, नावातंच दबदबा
ऐसपैस गं बसला, क्षणात वाहू लागला ........२
..
शब्द वेडा शब्दामाजी, ऐकू लागे एकेकाची
फैरी झडल्या झडल्या, पेश सर्वां कवितांची ......३
..
मिनीटे सेकंदाची गं, गणती कैसी करण्या
ओघ ओघा आवरेना, लागे कविता सजण्या! .......४
..
घडल्या क्षणांची पाने, लहरली रानोरानी
कविता कैसी स्फुरावी, सांगु लागली गं वाणी ........५
..
जीव आणिला कानात, वेचिता शब्दन शब्द
धुंदीत रंगले सारे, सामोरे ठाके प्रारब्ध ! .........६
..
पाहूणा न तो राहीला, आपुलकीची दे थाप
संपला तास अमुचा, चूप सारे आपोआप ! ........७
..
धार ही अमृताची, वाटलीही संपू नये
ट्रींग ट्रींग ट्रींग वाजे, वेळच गं संपून ये ! ..........८
..
सत्र दुजे, सज्ज सारे, ऐकूनि आधीचे,वारे
पिऊनि वेडे धुंदीत, फैर झडवी आवडे .........९
..
धावता धावता काटे, "वाढलीत" सारी ताटे
सगळे धुंद ऐकत, भुकेलाही झाले फाटे ! .........१०
..
काक लागे कोकलाला, एक झाले संपवाया
गप्पात भरली पोटे, सत्रास सज्ज तिसऱ्या ! ........११
..
अफलातुनि कल्पना, चार संचात वाटणी
कल्पना लढविल्यात, अलग त्यांची धाटणी .........१२
..
सुरूवात करीती गं, पुढे येऊनि संचात
उघडू लागले सारे, जे दडलेले मनात ! .........१३
..
मनाच्या मनी रंगले, उमलले संच चार
श्रोते आम्ही मंत्रमुग्ध, घड्याळ दाखवे चार !! .........१४
..
निरोपा जमले सारे, मनात एकच ध्यास
चिंतन मनन सार, चला करूया अभ्यास ! .............१५

..

सुरेश पेठे
१०मार्च०९

No comments: