Thursday, March 5, 2009

शोध मनाचा ! (भाग तीन )

..
मनाचिया बातचीत
केली थोडी अकस्मात
मन नाहीच सोडीत
माझा पिच्छा, मन:शांत ! .... १
..
मन विटले पाहूनि
स्वप्ने अवघी विरली
हटली झांपडे सारी
आशा आकांक्षा नुरली .... २
..
जळमटे झटकली
लक्तरे झळकलीत
मनात जरी निराशा
घाली बाहेर वाळत ! .... ३
..
मनातले मनामध्ये
कधी येई ओठावर
कधी गळे नजरेत
घ्यावे समजून सार ! .... ४
..
माझ्या मना-मनातून
तुला करी आवाहन
तुज साठी अनुष्ठान
मी ते इथे आरंभले ..... ५
..
पाकळ्यांना उलगडू
मनातील अंतरंग
शोध घेऊ कण कण
उधळीत सप्त रंग ..... ६
..
येऊ पुन्हा एकत्रित
फड रंगवु मन- काव्या
झपाटून शोध घेऊं
आश्वासित संचिताचा ! .... ७
..
जीवा-शिवाची ही गांठ
आता मला हवी भेट
आता नको लपंडाव
खेळ पुरे भेट थेट ! ..... ८
..
तुझे अखंड चिंतन
तुला दिले आवंतण
मना शोध ओसंडून
येऊ दे मनी उधाण ! .... ९

..
..
सुरेश पेठे
०५मार्च०९

No comments: