Thursday, May 28, 2009

गोविंद गोपाल !

होतो गर्भात, पहूडलेला माझा मी अति शांत
सुखावलेली ती माय चुळबुळीने माझ्या आंत

बाहेर आलो या जगी, तुमच्यात मी रहायला
पण ? काय ही गडबड मिळतेय ऐकायला ?

अरे देवा, कशाला तूं , मजला इथेच धाडले 
आईविना  करू काय आधीच का नाही गाडले ?

माते तूं गेलीस, सोडूनि मला घालूनि जन्माला
कसे साहू आता कां न तत्क्षणी मज उन्माळला

ऐकू येतेय कुजबुज, कोण मला सांभाळील
हाय दैवा, क्रूर अशी थट्टा कां रे आरंभलीय ?

हा गोंधळ चालला असता अवतरली माय
लेकरूं स्वत:चेच समजून उचलले काय ?

क्षणात घेई मांडीवर पहूडलो पदरांत
जणु काय मजला पुन्ह:श्च घेतले उदरांत !

भूक माझी कळली तिला, ऐकून माझा आकांत
स्तनाशी कवटाळून घेताच झालो की मी शांत !

हळूंच मी पाहतोय मातेचे ते सुंदर मुख
शेजारीच शांत निजविलेला माझा बंधू एक

अल्पस्वल्प बुध्दीला माझ्या, काही कळलंच नाही
सुखावलेली माय, आम्हा दोघात काय ते पाही ?

सुखावले इतरे जन, शांत झाला कोलाहल
आम्हांकडे पहात माय म्हणे, गोविंद गोपाल !!

सुरेश पेठे
२८ मे ०९

1 comment:

Unknown said...

छान लिहलय काका....