Monday, February 23, 2009

शोध मनाचा ! भाग एक

कुणा घ्यावयाचा शोध
दडलेय काय मना ?
शोधून शोधता नाही
ठाव घेऊ मिळेचना !
..
हे काम त्या कुंभाराचे
तुडवी माती पायाने
मातीत मन घडवी
मातीचेच अवधाने !
..
ही तर त्याची किमया
ज्याने घडविली काया
बहुविध मनी रूपे
पिसारा पसरी छाया !
..
पिसा सारखे हलके
तरंगते मन वेडे
वेडेपणातूनच रे
सर्वां रूपडे आवडे !
..
ह्या माती मधून बीज
मनी पेरतो सदैव
त्याचेच ना आहे शेत
उगवितो रे सुदैव !!
..
एक बीजा पोटी तरू
होईल त्यांचे अर्णव
करता करविता तो
ठेव मनी रे जाणीव !
..
विषयाची चिंता त्याला
अल्प ना कमतरता
मनी वसलेले आहे
प्रकटते उगाळिता !!
..
शोध घेण्यास उतरा
अंमळ ह्या चिखलात
चकीत होऊन जाल
सांपडे मन-मनात

शोध कितीही घेतला
अपूर्णतेने शापिला
शोध जारी तरी ठेवा
प्रयत्ना त्यासी अर्पिला

..
सुरेश पेठे
२३फेब्रु०९

No comments: