Wednesday, August 17, 2011

एकमेव निर्धार !




तुझे हे, अजब नव्हे सरकार ?
मनमोहना, असाच का रे, अधांतरी दरबार  ॥ धृ ॥

सवे घेउनि भ्रष्टाचारी, कधीच ना त्यां आवरी !
भोळी भाबडी जनता इथली तरी करि जयकार   ॥ १ ॥

कसाब आहे इथे जांवई, रोजच मिळे त्यास मलाई
भुकी माणसे बघती तुजकडे मिळेल का आधार   ॥ २ ॥

भ्रष्ट भ्रष्ट जे जे असती, पंक्तीला ते तुझ्याच बसती
एक सूरही ’ विरोधात ’ त्या खपवून नाही घेणार  ॥ ३ ॥

म्हणे आपुले लोकशाहीचे, सरकार इथे आहे जनतेचे
भ्रष्टाचाराचे रूप नव नवे, दाखवीशीस दशावतार   ॥ ४ ॥

जनता इथली मोताद अन्नास, हात लाविशी तरी अण्णास
पापाचे गड्या भरले घडे, आता शीघ्र हो पायउतार  ॥ ५ ॥

असलास कितीही निगरगट्ट , पेटली जनता करी हट्ट
मारीत रट्टा, पुरता गाडू , केलाय एकमेव निर्धार ॥ ६ ॥

सुरेश पेठे
१७ ऑगस्ट २०११

Wednesday, August 10, 2011

न्या येथून !




तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे


केलास उशीर
जरी आजवरी
तृप्त झालॊ हरी
तुझ्या ठायी !


तुझ्याच कृपेने
पोचे इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !


भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता करा त्वरा
न्या येथून !


सुरेश पेठे
११ ऑगस्ट २०११