Thursday, June 16, 2011

त्राण !

बरसत राही घन
आठवांना फुटे पानं
अचंबित झाले मन
पण घेतलीय आण ॥

काय पाहू काय ऐकू
टवकारले गं कान
काहूर आठवणींचा
नाही उरले गं भान ॥

चिंब चिंब चोहिकडे
भिजले सारे आंगण
मज पडले साकडे
नाही साहवे हा ताण ॥

झड झड संपेचना
कसे आवरू रे मन ?
कुठे थांबलासी कान्हा
अंगी उरला ना त्राण ॥

सुरेश पेठे
१६ जून २०११